• Nitten Gokhaley

काही डिजिटल मार्केटर्सच्या मनात त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चितता

नित्तेंन गोखले, अभिषेक सिंह राव


डिजिटल मार्केटिंगचे कौशल्य राखणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या पुष्कळ संध्या उपलब्ध असल्याचे अनेक विश्लेषक सांगतात. परंतु या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत असलेल्या काही तरुण-तरुणींचे मत थोडे वेगळे आहे. जगातील सर्वात वेगाने-वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील डिजिटल मार्केटर्सच्या मनात त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चितता आहे.


इंटरनेट वर्ल्ड स्टेट्स या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इंटरनेट सेवेचा वापर करणाऱ्या लोकांच्या संख्येत भारत दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. वाढती संख्या पाहता, भारत लवकरच चीनला मागे टाकत पहिले स्थान पटकावेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. या सतत वाढणाऱ्या आकडेवारीचे श्रेय जाते ते माफक दारात इंटरनेट सेवा ग्राहकांना पुरवणाऱ्या कंपन्यांना.

दुकानात जाण्यापेक्षा सध्या इंटरनेट वापरणारे लोक मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. वर्ष २०२२ पर्यंत, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था (डिजिटल व्यवहार) 1 ट्रिलियन डॉलरच्या आकड्यास स्पर्श करेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बदलत्या काळाबरोबर औद्योगिक क्षेत्र डिजिटल होताना दिसते आहे. कंपनीच्या उत्पादनाला व वस्तुंना सोशल मीडिया साइट्स तसेच गुगलच्या सर्च इंजिन (रीझल्ट) निकालांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सर्वच क्षेत्रात डिजिटल मार्केटिंगचा परिणाम दिसून येत आहे. यामुळेच, भारतात अनेक आंतराष्ट्रीय डिजिटल मार्केटिंग एजन्सीजने कार्यालये उघडली आहेत.

“तरुण वर्ग डिजिटल मार्केटिंगकडे करिअर म्हणून पाहत आहे”

आठ ते दहा वर्ष डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात रुजू असलेल्या लोकांना या क्षेत्राची निवड कशी केली विचारल्यास "एन्ट्री बाय-चॉईस नसून बाय-चान्स" झाल्याचे अनेक लोक सांगतात. त्याकाळात डिजिटल मार्केटिंगला एस.ई.ओ (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) म्हणले जायचे. आयटी तसेच वेब-साईट डिझाईन करणाऱ्या कंपन्या ही सेवा पुरवायच्या.

सध्या डिजिटल मार्केटिंग अंतर्गत सोशल मीडिया मार्केटिंग, ई-मेल मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग (एसइएम), सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ), मोबाइल मार्केटिंग, कन्टेंट मॅनेजमेंट, व व्हिडीओ किंवा ऑडीओ कन्टेंट असे भाग आहेत.

तरुण वर्ग इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सारख्या माध्यमांवर पकड धरून असल्यामुळे अनेकजण डिजिटल मार्केटिंगकडे करिअर म्हणून पाहत आहेत. पदवी शिक्षणानंतर या क्षेत्रात नोकरीसाठी डिजिटल मार्केटिंग शॉर्ट-टर्म डिप्लोमा किंवा सर्टीफिकेट कोर्स केला तरी पुरेसा ठरूशकतो. गूगल सर्च अल्गोरिदम मध्ये बदल झाला की मार्केटिंगच्या पद्धतीत देखील काहीना काही बदल होतो. त्यामुळे अपडेटेड राहणे गरजेचे असते. डिजिटल मार्केटरकडे एजन्सीमध्ये नोकरी करणे किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणे असे दोन पर्याय असतात. परंतु, या क्षेत्रात अनेक वर्ष काम करणाऱ्या काही तज्ज्ञांना या उद्योगातील वाढत्या आव्हानांमुळे देशातील डिजिटल मार्केटिंगच्या भविष्यातील व्याप्ती बद्दल खात्री वाटत नाही.
“डिजिटल मार्केटिंग उद्योगातील वाढती आव्हाने”

या उद्योगातील कंपन्यांच्या वेतनश्रेणीत फरक असल्यामुळे दिल्ली आणि बंगलोरसारख्या श्रेणी -१ शहरांत डिजिटल विपणन कार्यकारी म्हणून काम करत असलेले लोक अहमदाबाद व जयपूर मध्ये दिल्या जाणाऱ्या पगाराच्या ५ पट जास्त पैसे मिळवतात.

दर महिना भारतातील विविध शहरात अनेक छोट्या डिजिटल मार्केटींग एजन्सीज सुरु व बंद केल्या जातात. त्यांच्या अपयशामागील कारणे भिन्न आहेत. देशात सक्रिय डिजिटल विपणन एजन्सींची संख्या ५०० हुन अधिक आहे. अशा स्पर्धेमुळे नवीन ग्राहक मिळवणे तसेच त्यांना टिकवून ठेवणे अत्यंत कठीण झाले आहे.

आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका डिजिटल मार्केटिंग एक्झीकेटिव्हने अनेक समस्यांवर चर्चा केली.

ते म्हणाले, “यापूर्वी काम करत असलेल्या कंपनीत मला एका क्लायंटने त्याच्या भौगोलिक प्रदेशातील गुंतवणूकीच्या योग्य संध्या शोधण्यास सांगितले. त्यांना नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याची इच्छा होती. मॅनेजरने हा महत्वाचा क्लायंट असल्याचे सांगून मला रोजचे काम सोडून माझ्या क्षेत्राशी काडीचा संबंध नसलेल्या कामात गुंतविले. व्यवसाय अयशस्वी झाल्यास क्लायंट निराश होऊन आपल्या कंपनीला दिलेले डिजिटल मार्केटिंगचे काम देखील थांबवू शकतो अशी आमच्या व्यवस्थापकाने मला चेतावणी दिली. हे अनुभव छोट्या एजन्सींत काम करणाऱ्या डिजिटल मार्केटिंग एक्झीकेटिव्हसाठी काही नवीन नाहीत. अशा हास्यास्पद व असामान्य अपेक्षांचा डोंगर क्लायंट एजन्सीसमोर ठेवतात.”

अगदी थोड्या पैशात डिजिटल विपणन मोहीम चालवून, आपल्या उत्पादनाला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचवून करोडो रुपये एक किंवा दोन महिन्यात कमावता येतील असा काही उद्योजकांचा गैरसमज झाला आहे. वेबसाइटसाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे कॉन्ट्रॅक्ट दिल्या-दिल्या काही लहान उद्योजक एजन्सीला कॉल करून ट्रॅफिक कधी वाढणार, ई-कॉमर्स व्यवसाय महसूल दुप्पट तिप्पट कधी होणार असे प्रश्न विचारू लागतात. या भलत्या अपेक्षांमुळे एजन्सी मॅनेजर्स डिजिटल मार्केटरवर दबाव आणतात.

डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालविणारे लोक किंवा फ्रीलान्सर्स अगदी सिगरेट-तंबाखूच्या दुकानाबाहेर व ऑटो-रिक्षा हूडवर एजन्सीचा फोननंबर देऊन लोकांचे व्यवसाय महसूल महिनाभरात दुप्पट करण्याचे आश्वासन देतात. डिजिटल मार्केटिंग प्रक्रियेबद्दल काही अभ्यास नसलेले लोक फसतात. परंतु एक-दोन महिने मोहीम चालवून व्यवसाय उत्पन्न दुप्पट न झाल्याने काही छोटे व्यापारी एजन्सीचे ठरलेले पेमेंट करण्यास नकार देतात. अशाने अनेक डिजिटल मार्केटिंग कंपन्या बंद होतात. डिजिटल मार्केटिंग मोहीम चालवून सहजासहजी महसूल दुप्पट तिप्पट होत असता तर प्रत्येक छोटा उद्योजक, व्यावसायिक करोडपती झाला असता.

एकंदरीत, या सर्व कारणांमुळे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करत असलेल्या काही लोकांना त्यांच्या व्यवसायाच्या भविष्याबद्दल अनिश्चितता वाटते.

“डिजिटल मार्केटिंग इव्हेंट्स दरम्यान केल्याजाणाऱ्या चर्चा पोकळ?”

या इव्हेंट्सच्या माध्यमातून काहीतरी शिकून रोजच्या कामात वापरता येतील अशा मोजक्या गोष्टी असतात. त्याचे कारण म्हणजे बहुतेक डिजिटल मार्केटींग इव्हेंट्स दरम्यान जगभरातील मोठ्या ब्रॅण्ड्ससाठी नावाजलेल्या एजन्सीजने चालविलेल्या कॅंम्पेन व त्याच्या यशावर प्रकाश पाडला जातो. अमेरिकन किंवा युरोपियन केस स्टडीज समजून घेऊन भारतीय कंपन्यांच्या डिजिटल मार्केटिंगवर काम करणाऱ्या एक्झिक्युटिव्हना फारसा फायदा होत नाही ही बाब या क्षेत्रातील तज्ज्ञ जाणतात. भारतीय ग्राहकांची खर्च करायची तयारी तसेच अपेक्षा वेगळ्या आहेत. दोन उच्च-गुणवत्तेचे ब्लॉग्ज आणि बॅकलिंक्ससाठी दर महिना रु २५,००० खर्च करणे छोट्या उद्योजकांना पुरेसे वाटत नाही. त्यांना अभियानासाठी संबंधित रक्कम खर्च केल्यानंतर दृश्यमान परिणाम पाहण्यात रस आहे. परंतु छोटे बजेट (रु २५, ००० ते ३०,०००) असलेल्या ग्राहकांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा कशा सुधारता येतील यावर चर्चा किंवा नियोजन करण्याची कोणाची इच्छा दिसत नाही.

देशाच्या कानाकोपऱ्यात लघु आणि मध्यम व्यावसायांची संख्या जास्त आहे, आणि यांच्याकडून मिळणारे काम छोट्या डिजिटल मार्केटर्सना अस्तित्व टीकाविण्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे असे क्लायंट हाताळताना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. ही बाब जाणून देखील काही तज्ज्ञ मौन राखणे पसंत करतात. डिजिटल मार्केटिंग चर्चा सत्रात अशा छोट्या बजेट असलेल्या क्लायंट बद्दल चर्चा करणे कदाचित कमीपणाचे मानले जाते.

गूगलसाठी काम करणारे तज्ज्ञ देशाच्या विविध शहरात होणाऱ्या कार्यक्रमातून एजन्सींना स्थानिक भाषांचा वापर वाढविण्याचा सल्ला देत आहेत. परंतु डिजिटल मार्केटिंग चर्चा सत्रात प्रादेशिक भाषांमध्ये चालविल्या जाणार्‍या डिजिटल मार्केटींग मोहिमांना फारसे महत्व दिले जात नाही. अशा कार्यक्रमांमध्ये बहुतेक वादविवाद आणि चर्चा देखील इंग्रजीमध्ये केल्या जातात. काहीलोक अशा डिजिटल मार्केटींग इव्हेंट्स दरम्यान प्रादेशिक भाषांमध्ये बोलणे देखील कमीपणाचे मानतात.

उपलब्ध असलेल्या आकडेवारी प्रमाणे देशातील लोकसंख्येच्या केवळ एक टक्का लोकांची इंग्रजी ही मातृभाषा आहे. या व्यतिरिक्त, साधारण २० ते २५ टक्के लोक इंग्रजी भाषा समजू व बोलू शकतात. उरलेले सर्व लोक हिंदी, बंगाली, मराठी, तामिळ, तेलगू, कन्नड, तसेच इतर प्रादेशिक भाषांचा वापर करतात. म्हणूनच, इंग्रजीला भारतात डिजिटल मार्केटींगसाठी प्राथमिक भाषा समजणे हे कदाचित एक चुकीचे तर्क आहे.

अशा कार्यक्रमात विविध पुरस्कारांसाठी केवळ नामांकन मिळावे यासाठी डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांना हजारो रुपये एन्ट्री-फी भरावी लागते. इव्हेंटसाठी ऑफिसला सुट्टी घेऊन, दुसऱ्यागावी ट्रेन/विमानाने जाऊन हॉटेल मध्ये उतरायला लागणारा खर्च वेगळाच. एवढे सगळे खर्च सांभाळून असंबद्ध संभाषणांवर लक्ष केंद्रित करणार्‍या कार्यक्रमांना उपस्थित राहावे की नाही असा अनेक लोकांना प्रश्न पडतो.


This column was first published in Pune's Prabhat Newspaper on February 23,2020


0 comments