• Nitten Gokhaley

रशियाचे हिरो तर ब्रिटनसाठी देशद्रोही: जॉर्ज ब्लेक

ब्रिटनसाठी तुरुंगातून फरार झालेला देशद्रोही तर् रशियात वीरपुरुष म्हणून जॉर्ज ब्लेक यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ब्रिटीश गुप्तचर संघटना एम.आय-६ बरोबर काम करत असताना कोम्मुनिस्ट विचारांना बळी पडून रशिया साठी हेरगिरी करणारे जॉर्ज ब्लेक यांचा डिसेंबर २६, २०२० रोजी वयाच्या ९८ व्य वर्षी मृत्यू झाला. यामुळे सध्या जॉर्ज ब्लेक यांचे आयुष्य चर्चेचा विषय बनला आहे.


ब्लेक यांचा जन्म नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरात नोव्हेंबर ११, १९२२ रोजी झाला. जानेवारी १९४३, दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ते ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. ब्रिटीश नौदलात सामील झाल्यानंतर जॉर्ज ब्लेक यांची नियुक्ती १९४४ मध्ये ब्रिटीश सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस (एम.आय-६) साठी करण्यात आली. युद्धानंतर, ब्लेक यांनी जर्मनीच्या हॅमबर्ग शहरात सेवा बजावत असताना केंब्रिज विद्यापीठात रशियन भाषेचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९४८ पासून पुढील काही वर्ष त्यांनी सेऊल शहरात कम्युनिस्ट उत्तर-कोरिया तसेच चीन व सोव्हिएत रशिया देशांविषयी माहिती गोळा करण्यात घालवली.George Blake


सन १९५० च्या कोरियन युद्धात त्यांना अटक करण्यात आले. उत्तर-कोरियाच्या तुरूंगात असताना कार्ल मार्क्सच्या कामांबद्दल वाचल्याने ब्लेक प्रभावित झाले. त्यांची तुरुंगातून सुटका १९५३ दरम्यान झाली तेव्हा ते वचनबद्ध कम्युनिस्ट झाले होते. एम.आय-६ ने १९५३ दरम्यान त्यांना बर्लिन मध्ये सोव्हिएत रशियासाठी काम करणाऱ्या गुप्तहेरांबाबत माहिती गोळा करायला पाठविले. तेथूनच त्यांनी ब्रिटनशी देशद्रोह करण्यास सुरवात केली.


१९५३ ते १९६१ दरम्यान ब्लेकयांनी रशियाला पुरविलेल्या माहितीमुळे 40 हून अधिक एम.आय-६ गुप्तहेरांना जीव गमवावा लागला. त्यांनी पाश्चात्य देशांतील गुप्तचर एजंट्स तसेच रशियावर पारख ठेवणाऱ्या यंत्रणेची माहिती मॉस्कोला पुरवून ब्रिटन व अमेरिकेच्या चालींचा पूर्णपणे पर्दाफाश केला.


पोलिश गुप्तसेवेचा एक महत्वाचा भाग असलेले मायकल गोलेन्यूस्की १९६१ दरम्यान अमेरिकेस स्वाधीन झाले. त्याच काळात त्यांनी ब्रिटन एम.आय-६ मधील एक अधिकारी रशियाला मिळालेला असल्याचा गौप्यस्फोट केला. हा धोकेबाज दुसरा-तिसरा कोणीनसून जॉर्ज ब्लेक असल्याचे समजताच लेबनॉन सोडून त्यांना लंडनला बोलावले व विमानतळावरच अटक करण्यात आली.


पाश्चिमात्य देश कोणतीही कारवाई करण्याआधीच रशियाला माहिती पोचवली जायची. शीतयुद्धात ब्लेकने ब्रिटीश गुप्तहेरयंत्रणेचे प्रचंड नुकसान केले. अनेक लोक पकडले गेले, मारलेगेले. सोव्हिएत युनियनची मुख्य सुरक्षा एजन्सी, के.जी.बी ने ब्रिटीश गुप्तहेराच्या मदतीने एम.आय-६ ला मात दिल्याची बातमी जगभर पसरल्याने देशाची अब्रू धुळीस मिळाली. में ३, १९६१ रोजी जॉर्ज ब्लेक यांना कोर्टानें बेचाळीस वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.


जॉर्ज ब्लेकने १९६६ साली लंडनच्या वर्मवुड स्क्रब तुरुंगातून सहाय्यकांच्या मदतीने पळ काढून ब्रिटनला पुन्हा मोठा धक्का दिला. ते थेट रशियात गेले, तेव्हापासून तिथलेच नागरिक बनून राहिले. काही वर्षांनी रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत १९५३ ते १९६० कालावधीत स्वतःकडे येणाऱ्या प्रत्येक गोपनीय कागदपत्रांचे मिनॉक्स कॅमेराने फोटो घेऊन ते रशियाला पाठविल्याचे कबूल केले.


“ऑपरेशन गोल्डची केली माती”


जवळच्या रोमानिया, हंगेरी, बल्गेरिया आणि पोलंडप्रमाणेच पूर्व-जर्मनी देखील त्याकाळात सोव्हिएत युनियनच्या नियंत्रणात असे. यासर्वात, पूर्व-जर्मनीची एक विशेष भौगोलिक आणि राजकीय भूमिका होती. या भागातील सेनेच्या टेलिग्राफ व टेलिफोन लाईन (ओव्हरहेड तसेच भूमिगत) बर्लिन मध्ये जोडल्या गेल्या होत्या. यागोष्टीचा फायदा घेण्यासाठी अमेरिकेने पश्चिमजर्मनीतुन पूर्व-जर्मनीत (बर्लिन) बोगदा बनवून लाइनस शोधून फोन टॅपिंग करण्याचे ठरविले. सी.आय.एने पूर्व-जर्मन टपाल सेवेतील सूत्रांचा वापर करून सोव्हिएटच्या भूमिगत केबल्सअसलेल्या जागांची माहिती मिळविली.

सेंट्रल इंटेलिजेंसचे संचालक ऍलन ड्यूल्स यांनी जानेवारी १९५४ मध्ये गुप्त बोगदा बनवून फोन टॅपिंग ऑपरेशन सुरु करण्याचे आदेश दिले. या योजनेचे नाव ऑपरेशन गोल्ड ठेवण्यात आले होते. बोगद्याच्या खोदकामाचा आवाज झाकण्यासाठी परिसरात अमेरिकेच्या एयरफोर्स रडार व गोदामाच्या बांधकामासाठी काम सुरू केले गेले. मे १९५५ मध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले. सी.आय.एने फोन टॅप करून कॉल्स ऐकण्यासाठी ६०० एजंट कामाला लावले होते. परंतु यातून काहीच महत्वाची माहिती हाती लागली नाही. त्याचे कारण, जॉर्ज ब्लेक!

१९५४ दरम्यान ब्रिटन व अमेरिकन अधिकाऱ्यांच्यात झालेल्या एका बैठकीत ब्लेक यांना अमेरिकेचा दूरध्वनी-लाईन टॅप करण्याचा डाव समजला. त्यांनी काही दिवसातच ऑपरेशन गोल्ड बाबत सर्व महत्वाची कागदपत्रे मॉस्कोला पोचविली.


यासूचनेवर कारवाई करून अमेरिकेचा डाव जगासमोर आणल्यास सर्वांची नजर ब्लेक यांच्यावर येऊशकेल असे केजीबी अधिकाऱ्यांना वाटले. यासाठीच त्यांनी बर्लिन द्वारे येणाऱ्या टेलिग्राफ व फोनकॉल्स मधून गुप्त सूचना दुसऱ्या मार्गाने मिळवणे सुरु केले. शेवटी ११ महिने झाल्यानंतर रशियाने या ऑपरेशनचा तपशील पत्रकारांसमोर मांडला.


सीआयच्या आकडेवारी प्रमाणे ऑपरेशन दरम्यान ४०,००० तासांची फोन संभाषण ऐकण्यात आली. त्यातून १,७५० गुप्तचर अहवाल मिळवण्यात आले. स्वतःचा मूर्खपणा झाकायला अमेरिकेने ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगून स्वतःच्या अधिकाऱ्यांना शाबासकी दिली. पण काही वर्षांनी ब्रिटिश संरक्षण निरिक्षकांनी ऑपरेशन फ़ेल गेल्याचे कबूल करून ब्लेकयांना नुकसानीस कारणीभूत ठरवले.


“रशियाचा नायक”


एजंट जॉर्ज ब्लेक यांच्यावर शासकीय इतमामात पश्चिम मॉस्कोमधील ट्रॉयकुरोव्सकोये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ब्लॅकचे “उत्कृष्ट कार्यकारी”असे वर्णन करून श्रद्धांजली वाहिली.


“पुढील वाचनासाठी”


याविषयावर ब्रिटिश लेखक रॉजर हर्मिस्टन यांचे "द ग्रेटेस्ट ट्रेटर: द सीक्रेट लाइफ ऑफ जॉर्ज ब्लेक," हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. भारतीय गुप्तचर संस्था (रॉ) रिसर्च अँड अँनालिसिस विंगचे देखील काही गुप्तहेर अधिकारी डबल एजन्ट बनून अमेरिकेच्या सी.आय.एसाठी काम करत होते. यावर रॉचे माजी अधिकारी, आर. के. यादव, यांचे "मिशन आर-अँड- ए-डब्ल्यू" हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.


ऑपरेशन गोल्ड आणि जॉर्ज ब्लेक यांच्यावर अनेक माहितीपट बनविले गेले आहेत.१९६३ (जेम्स बॉंड) "फ्रॉम रशिया विथ लव" या चित्रपटात एका दृश्यात अली-कॅरीम-बे हे पात्र जेम्स बाँडला भूमिगत कक्षात 'रशियन वाणिज्य दूतावास' अंतर्गत सुरूअसलेले संभाषण ऐकण्यासाठी घेऊन जातो. हे दृश्य दिग्दर्शकाने ऑपरेशन गोल्ड पासून प्रेरणा घेऊन रचले असे म्हटले जाते.


लेखक: नित्तेंन गोखले


This column was published in Pune's Prabhat Marathi Newspaper on January 10, as a part of their Rupgandh supplement.
0 comments